श्रद्धा कपूर पहिल्यांदाच साकारणार डबल रोल, 'चालबाज इन लंडन'चा व्हिडिओ केला शेअर

श्रद्धा कपूर पहिल्यांदाच साकारणार डबल रोल, 'चालबाज इन लंडन'चा व्हिडिओ केला शेअर

श्रद्धा कपूर स्ट्रिट डान्सरनंतर कोणत्याच चित्रपटातून दिसली नाही. मोठ्या पडद्यावर घेतलेल्या या मोठ्या ब्रेकनंतर आता तिने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. लवकरच ती ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यासाठी तिने तिच्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात श्रद्धा पहिल्यांदाच डबल रोल म्हणजेच दुहेरी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात काम करणं श्रद्धा कपूरसाठी एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. 

काय आहे 'चालबाज इन लंडन'चं कथानक

काही वर्षांपूर्वी म्हणजेच 1989 साली दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा 'चालबाज' चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते पंकज पाराशर यांनी. या चित्रपटात  श्रीदेवी, रजनीकांत आणि सनी देओल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. श्रीदेवीने साकारलेली दुहेरी भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. दिग्दर्शक पंकज पाराशर आता पुन्हा एकदा श्रद्धा कपूरसोबत या चित्रपटाचा रिमेक करणार आहेत. श्रद्धा कपूर यात श्रीदेवींचे पात्र साकारणार आहे. श्रद्धासाठी हा चित्रपट खूप खास असणार आहे. कारण श्रीदेवीने तिच्या अफलातून अभिनयाने या चित्रपटाला एका विशिष्ठ उंचीवर नेलेलं आहे. त्यामुळे तिची दुहेरी पात्रांची भूमिका साकारणं श्रद्धासाठी नक्कीच आव्हानात्मक असणार, शिवाय श्रद्धा या निमित्ताने पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारणार आहे. 

श्रद्धाने शेअर केला खास मेजेस

श्रद्धा कपूरने या चित्रपटाची अधिकृत घोषणा करत सोशल मीडियावर एक खास मेसेजदेखील शेअर केला आहे. श्रद्धाने शेअर केलं आहे की, "चालबाज इन लंडनचं दिग्दर्शन फक्त आणि फक्त पंकज पाराशरच करत आहेत आणि या चित्रपटाचे निर्माते आहेत भूषण कुमार, कृष्ण कुमार, अहमद खान आणि शायरा खान, या मेसेजमधूव श्रद्धाला बरंच काही सांगायचं आहे  हे जाणवत आहे. शिवाय तिच्यासाठी हा चित्रपट आणि मिळालेली नवी संधी खूपच महत्त्वाची आहे.

श्रीदेवीला वाटत होतं की...

प्रेक्षकांना कदाचित माहीत नसेल की, चालबाजची मूळ अभिनेत्री दिवंगत श्रीदेवीला या चित्रपटामध्ये आलिया भट असावी असं वाटत होतं. एका मुलाखतीत श्रीदेवी म्हणाली होती की, जर आजच्या जमान्यात चालबाज सारख्या चित्रपटाचा रिमेक झाला तर खूप चांगलं होईल या चित्रपटासाठी माझ्या मते आलिया भट अगदी परफेक्ट आहे. कारण तिचा स्वभाव मस्तीखोर आहे शिवाय ती त्यासोबतच दंगेखोर आणि सालस अशा दोन्ही स्वभावाची दिसू शकते. मात्र श्रीदेवीचं हे म्हणणं पूर्ण नाही होऊ शकलं कारण खरंच चालबाजचा रिमेक होत आहे मात्र या चित्रपटात आलियाच्या ऐवजी आता श्रद्धाला कास्ट केलं गेलं आहे. चालबाजमध्ये श्रीदेवीच्या दुहेरी भूमिकांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं होतं. एक अतिशय मस्तीखोर मुलगी आणि एक अतिशय सालस, गरीब स्वभावाची मुलगी अशा दुहेरी भूमिका या चित्रपटात तिने साकारल्या होत्या. या चित्रपटाचे कथानक आणि गाणी त्याकाळी खूप गाजली होती. श्रीदेवीची रजनीकांत आणि सनी देओलसोबत असलेली ऑनस्क्रिन केमिस्ट्रीदेखील खूपच गाजली होती. तेव्हा आता श्रद्धा कपूर श्रीदेवीच्या या दुहेरी भूमिकेत कितपत फिट बसतेय हे पाहणं नक्कीच उत्सुकता वाढवणारं असणार आहे.