ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या काळात प्रेक्षकांना खळखळून हसवणारी जोडी म्हणजे लॉरेल आणि हार्डी. आता अनेकांना त्यांच्या लहानपणी लॉरेल अॅण्ड हार्डी पाहिलेले १०० टक्के आठवले असेल. बारीक लाॅरेल आणि जाड्या हार्डीची जोडी ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या काळात त्यांच्या कॉमेडीने खळखळून हसवायची. आता तुमच्या लहानपणी तुम्ही त्यांचा कार्यक्रम पाहिला नसेल तर आता त्यांना पुन्हा पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. पण ही संधी कॉमिक स्वरुपात उपलब्ध होणार आहे. एप्रिल २०१९ मध्ये अमेरिकन मायथोलॉजिकल कॉमिक नव्या रुपात लॉरेल आणि हार्डीला आणणार आहेत. त्यामुळे कॉमिक वाचणाऱ्यांना लॉरेल आणि हार्डीच्या नव्या गोष्टी वाचायला मिळणार आहेत.
असे असेल कॉमिक
अमेरिकन मायथोलॉजी या प्रकाशकांनी या पुस्तकाचे एक कव्हरदेखील शेअर केले आहे. यामध्ये लॉरेल आणि हार्डी दोघेही वाळवंटात असून उंटावर बसलेले आहेत. त्यामुळे वाळवंटाच्या सफारीदरम्यान घडणाऱ्या गमतीजंमती दाखवण्यात येणार असा अंदाज येत आहे. पण ‘पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त’ कारण हे नुसते एका कॉमिकचे मुखपृष्ठ आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या गोष्टींची कॉमिक बुकं तयार झाली असून ती एक एक करत बाजारात आणली जाणार आहे. लेखक एल.के. चेक या कथा लिहिणार आहेत.ज्यावेळी लॉरेल आणि हार्डी यांना कॉमिक रुपात आणण्याचा विचार करण्यात आला त्यावेळी लेखकाचाही शोध घेतला जात होता. लेखक एल. के. चेक यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी अमेरिकन मायथोलॉजीच्या ऑफिसमध्ये धाव घेतली आणि संधी पटकावली हा अनुभव त्यांनी सोशल मीडियावरदेखील शेअर केला.
आजच राखून ठेवा कॉपी
जर तुम्ही कॉमिकचे फॅन असाल तर तुम्ही आजच तुमची लॉरेल आणि हार्डीची कॉपी राखून ठेवा, असे प्रकाशकाकडून सांगण्यात आले आहे. लॉरेल आणि हार्डीच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे. सध्या तरी #1 म्हणजे या कॉमिकचा पहिला भाग विक्रीसाठी सज्ज झालेला आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या काळातील ही जोडी असली तरी त्यांनी अनेक वर्ष आपल्या कॉमेडीने लोकांना धरुन ठेवले. आताच्या नव्या पिढीला लॉरेल आणि हार्डी कोण हे या नव्या कोऱ्या कॉमिकमधून कळणार आहेत.
कोण आहेत लॉरेल अॅण्ड हार्डी ?
जर तुम्हाला लाॅरेल आणि हार्डी कोण? हे माहीत नसतील तर त्यांची खास माहिती तुमच्यासाठी स्टॅन लॉरेल हा ब्रिटीश आणि ऑलिव्हर हार्डी हा अमेरिकन होता. दोघांनीही एकत्र येऊन लोकांना हसवण्याचे काम केले. १९२७ ते १९५० या काळात त्यांनी तब्बल १०७ चित्रपटातून एकत्र काम केले. सन ऑफ डेझर्ट हा त्यांचा पहिला सिनेमा १९३३ साली आला. या जोडीने लोकांना खळखळून हसवले. पण ही जोडी १९५७ला वेगळी झाली कारण ऑलिव्हरचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या सात वर्षात लॉरेल यांचे देखील निधन झाले. पण एक नक्की की,अमेरिकन सिनेमातील क्लासिक हॉलीवूडपटाचा काळ त्यांनी चांगलाच गाजवला. अगदी नव्वदीपर्यंत त्यांच्या जुन्या मालिका टीव्हीवरुनदेखील दाखवल्या जात होत्या. जाड्या आणि रड्या अशी त्यांची ही जोडी होती. त्यानंतरच्या काळात चार्ली चॅपलीने विनोदाची ही धुरा सांभाळली.